६२ वर्षीय नवरदेव ५६ वर्षाची नवरी ! पाचोऱ्यातील अनोखा विवाह सोहळा
जळगाव पाचोरा : विवाह सोहळा पवित्र सोळा संसारांपैकी एक संस्कार मानला जातो. जीवनात मोक्ष मिळवायचा असेल तर वैवाहिक जीवन महत्त्वाचे मानले जाते. बालविवाहाला मान्यता नसली तरी विवाहाचे वय मात्र अनिश्चित असल्याचे आपण पाहतो. जीवनाचा साथीदार अकाली सोडून गेल्यानंतर वृद्धापकाळाकडे वाटचाल करतानादेखील काहींना आधारासाठी विवाहाचा निर्णय घ्यावा लागतो.
असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरावासीयांनी अनुभवला. येथील ६२ वर्षीय आजोबांचा ५६ वर्षीय आजीशी विवाह पार पडला. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात आजी-आजोबांची मुले, मुली व नातवंडांनी अक्षता टाकून त्यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
पाचोरा येथील ६२ वर्षीय विजय खैरनार यांच्या पत्नीचे गेल्या काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांना एकाकी जीवन जगावे लागत होते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत असावी, सुखदुःखात एकमेकांची संगत लाभावी, असे प्रत्येकाला वाटते. पत्नीच्या निधनानंतर ६२ वर्षीय आजोबा एकाकी पडल्याने त्यांना म्हातारपणात कुणाची तरी साथसंगत लाभावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विवाहाचा विचार केला व सटाणा येथील ५६ वर्षीय अनिता चव्हाण या आजीबाईंची निवड केली.
अनिता चव्हाण यांच्या पतीचेदेखील गेल्या काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने त्या एकाकी जीवन जगत होत्या. दोघांनाही वृद्धापकाळात साथसंगत लाभावी, या विचारातून दोघांचा विवाह निश्चित करण्यात आला व सावखेडा येथील भैरवनाथांच्या मंदिरात आजी-आजोबांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.
दोघांच्या मुला, मुली व नातवंडांनी अक्षता टाकून त्यांना शुभेच्छा दिल्या. आजोबा-आजींनी एकमेकांच्या गळ्यात फुलमाळा टाकून म्हातारपणात जीवनाची नवी इनिंग सुरू केली.
या अनोख्या विवाह सोहळ्याची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पहा व्हिडिओ -


0 Response to "६२ वर्षीय नवरदेव ५६ वर्षाची नवरी ! पाचोऱ्यातील अनोखा विवाह सोहळा"
टिप्पणी पोस्ट करा