“ठाकरेंचा शिंदेंना ठाण्यातच दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 व अपक्ष 10 आमदारांसोबत बंड केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांचा शिंदे गटात जाण्याचा कल वाढला. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली. मात्र आता चित्र बदलत असल्याचं समोर आलय, आता ठाकरे गटात पुन्हा इनकमिंग सूरू झाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा एकदा ठाकरे गटात घरवापसी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील माजी नगरसेविकेने ठाकरे गटात घरवापसी केली. रागिणी वेरिशेट्टी यांनी पती भास्कर वेरिशेट्टी आणि कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्री निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी घरवापसी केली.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच पहिला हादरा बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी नगरसेवकांना ठाकरे गटात परतीचे वेध लागल्याचं दिसत आहे. याशिवाय आणखी काही नेते-पदाधिकारी यांची घरवापसी होण्याचा ठाकरे गटाकडून अंदाज वर्तवला जात आहे.

0 Response to "“ठाकरेंचा शिंदेंना ठाण्यातच दणका; शिंदे गटात प्रवेश केलेल्या नगरसेविकेनं पुन्हा ठाकरे गटात केली घरवापसी”"
टिप्पणी पोस्ट करा